आयपीएल जुगारावर छापा ; १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सचिन धानकुटे
वर्धा : – स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हिंगणघाट येथील आयपीएलच्या जुगारावर छापा टाकत १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हिंगणघाट येथील प्रतिक राजकुमार रामचंदानी(वय२३) ह्याच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगणघाट येथील प्रतिक रामचंदानी हा आपल्या राहत्या घरातच आयपीएलच्या सामन्यांवर हारजितचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याच्या घरी काल शनिवारी दुपारच्या सुमारास धाड टाकली असता, यावेळी तो मोबाईलच्या माध्यमातून चेन्नई विरुद्ध दिल्ली संघाच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळताना मिळून आला. याकरिता त्याने मोबाईलच्या माध्यमातून ताज टिव्ही नावाने समाविष्ट केलेल्या व्हाट्सएपवर जोकर बुक नामक टेलिग्राम चॅनेल विकत घेऊन सामन्याचा टॉस, बॉल टू बॉल, रन टू रन व विकेटवर ऑनलाइन पेमेंट करून व लोकांकडून नगदी पैसे घेऊन जुगार खेळताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्यांच्याकडून चार महागडे मोबाईल व ५८ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ६८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सदर आरोपीवर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबाळकर, विशाल मडावी, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, मंगेश आदे, प्रफुल्ल वानखेडे, मिना कौरती आदि विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.