कारची ट्रकला धडक : तिघे जागीच खल्लास ; समृद्धी महामार्गावरील महाबळा शिवारातील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – भरधाव कार समोरच्या ट्रकवर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील महाबळा शिवारात घडली. ज्योती क्षीरसागर, फाल्गुनी सुरवाडे व भरत क्षीरसागर अशी सदर अपघातातील मृतकांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मालेगांव येथून समृद्धी महामार्गाने डॉक्टर मैत्रिणी आपल्या एम एच ३७ जी ८५७८ क्रमांकाच्या वॅगन आर कारने कामानिमित्त नागपूरला जात होत्या. यावेळी डॉ ज्योती क्षीरसागर ह्या कार चालवीत होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांचे महाबळा शिवारात कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार समोरच्या एम एच ४० बिएल ८२३५ क्रमांकाच्या ट्रकवर जोरात धडकली. यात कारचा समोरील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. सदर अपघातात त्यांच्यासह डॉ फाल्गुनी सुरवाडे व भरत क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच जाम येथील महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत सेलू पोलिसांना माहिती दिली. सेलू पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.