नियम न पाळणाऱ्या ४३५ वाहन धारकांवर कारवाई ; २ लाख ११ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल
सचिन धानकुटे
वर्धा : – वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालका विरोधात वाहतूक विभागाच्या वतीने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. सदर मोहीमे अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारी ४३५ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली असून २ लाख ११ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. सदर मोहीमे अंतर्गत मंगळवार ता.२० रोजी विना हेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या २०१, सिटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाऱ्या १२०, दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या ०२ तसेच नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्या एकूण ४३५ वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. सदर वाहन धारकांकडुन २ लाख ११ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून वाहन धारकांनी वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.