मुलीशी बोलण्याच्या वादातून युवकास लोखंडी रॉडने मारहाण ; खापरी येथील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – मुलीशी बोलण्याच्या वादातून दोघांनी एका युवकास लोखंडी रॉडने मारहाण करीत जखमी केल्याची घटना नजिकच्या खापरी येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी तक्रारीहून पोलिसांनी निलेश सातपुते व सौरभ सातपुते रा. खापरी ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खापरी येथीलच निलेश वासेकर ह्याला आरोपी निलेश व सौरभ सातपुते हे दोघेही एका मुलीशी बोलण्याच्या कारणांमुळे नेहमीच शिवीगाळ करीत होते. दरम्यान गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास निलेश वासेकर हा आपल्या मित्रांसोबत गावातील शाळेजवळ उभा होता. यावेळी दोन्ही आरोपी आपल्या मालवाहू बोलेरो वाहनाने घटनास्थळी आले आणि त्यांनी निलेशला शिवीगाळ करणे सुरू केले. त्याने आरोपींना शिवीगाळ का करता असे म्हणताच, त्यांनी आपल्या वाहनातील लोखंडी रॉड काढला आणि निलेशच्या उजव्या खांद्यावर आणि गुडघ्यावर मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी दाखल तक्रारीहून सेलू पोलिसांत आरोपी निलेश सातपुते व सौरभ सातपुते ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.