आश्चर्य..! अख्खा ट्रॅक्टरचं गेला चोरीला ; आष्टी तहसील कार्यालयातील प्रकाराने खळबळ
सचिन धानकुटे
वर्धा : – चार महिन्यापूर्वी जप्त करण्यात आलेला अख्खा ट्रॅक्टरचं ट्रालीसह चोरीला गेल्याची खळबळजनक घटना जिल्ह्यातील आष्टी तहसील कार्यालयात नुकतीच उजेडात आली. याप्रकरणी नायब तहसीलदार यांच्या तक्रारीहून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगांव पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी भिष्णूर घाटातून विनापरवाना वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी एक ट्रॅक्टर ट्रालीसह जप्त केला होता. आष्टी येथील रामदास चरडे यांच्या मालकीचा एम एच ३२ एएस २६०७ क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि एक ब्रास काळी रेती भरुन असलेली ट्राली महसूल विभागाच्या कार्यवाहीनंतर २० मार्च रोजी आष्टी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली होती. याप्रकरणी चरडे यांना १७ जून रोजी २३ हजार १०० रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला. सदर दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेला तो ट्रॅक्टर आणि ट्राली रामदास चरडे यांच्या सुपूर्द करण्यात येणे आवश्यक होते. परंतु तो ट्रॅक्टर आणि ट्राली ज्याठिकाणी तहसील कार्यालयात होती, तीथे आता नसून चोरीला गेल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर याप्रकरणी नायब तहसीलदार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तहसील कार्यालय परिसरातूनचं जप्तीतल्या वाहनाची चोरी झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.