एटीएमच्या अदलाबदलीत शिक्षकाची फसवणूक ; ४२ हजारांचा घातला गंडा

सचिन धानकुटे
सेलू : – येथील एका शिक्षकाच्या एटीएम कार्डची अदलाबदली करीत चक्क ४२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी तक्रारीहून सेलू पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, सेलू येथील एका नामांकित शाळेचे शिक्षक महोदय पैसे काढण्यासाठी जवळच्या एटीएममध्ये गेले. बँक ऑफ इंडियाच्या “त्या” एटीएममध्ये त्यांनी दोनदा पैसे काढण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु एटीएममध्ये एरर दाखवत असल्याने पैसे काही निघाले नाहीत. एवढ्यात एका अनोळखी इसमाने एटीएमच्या खोलीत प्रवेश केला. शिक्षकास “पैसे निकाल रहे है, ट्राय करके देखू क्या..!” असे म्हटले असता, त्यांनी त्या इसमाकडे आपले एटीएम दिले. दरम्यान त्या भामट्याने चेक करण्याच्या नादात शिक्षकाच्या हाती भलतेच एटीएम ठेवले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच सदर शिक्षकाच्या मोबाईलवर आपल्या खात्यातून ४२ हजार रुपये वगळण्यात आल्याचा संदेश येवून धडकला. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सदर तक्रारीहून फसवणूकीचा गुन्हा दाखल करीत तपासात घेतला असल्याची माहिती आज गुरुवारी दिली.