महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या आंबटशौकीनाला नागरिकांचा बेदम चोप, पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल ; आठवडी बाजारातील घटना
आरएनएन
सेलू : – महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या आंबटशौकीन मनोविकृताला नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना काल मंगळवारी येथील आठवडी बाजारात घडली. याप्रकरणी “त्या” आंबटशौकीनावर सेलू पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एक महिला काल सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे आठवडी बाजारात गेली. दरम्यान त्या बाजारात खरेदी करीत असताना अचानक एका आंबटशौकीन मनोविकृताने त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर महिलेनं लागलीच “त्या” मनोविकृताच्या कानशिलात हाणली. त्यामुळे त्याठिकाणी उडालेला गोंधळ आणि घडलेला प्रकार हा उपस्थितांच्या निदर्शनास यायला वेळ लागला नाही. यावेळी चवताळलेल्या नागरिकांनी “त्या” आंबटशौकीनाला चांगलाच सार्वजनिक भत्ता दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन देखील केले.
याआधीही “त्या” मनोविकृताने सदर महिलेशी असभ्य वर्तन करीत त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. महिलांचा सातत्याने पाठलाग करीत त्यांच्यासमोर अश्लील हावभाव तसेच असभ्य वर्तनासाठी सदर मनोविकृत परिसरात ओळखला जातो.
आठवडी बाजारातील कालच्या घटनेनंतर “त्या” मजनूला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर सेलू पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांची छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहे.