पोलीस कर्मचाऱ्याची वृद्धास अमानुष मारहाण ; पैसे दिले नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप ; कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांच्या राज्यातील हप्तेखोरीचा सबळ पुरावा
सेलू : – पाच हजारांऐवजी केवळ तीनचं हजार रुपये दिल्याच्या कारणांमुळे घोराड येथील ५८ वर्षीय वृद्धास पोलीस कर्मचाऱ्याने अमानुष मारहाण केली. मधुमेहाच्या आजाराने पिडीत असलेला वृद्ध इसम मारहाणीनंतर अत्यवस्थ झाल्याने त्याला तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. त्यामुळे पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्या “त्या” पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी पिडीतासह कुटुंबातील सदस्यांनी पत्रकार परिषदेतून केली. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आता याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
घोराड येथील गोविंद जाधव यापूर्वी अवैध व्यवसाय करायचे, परंतु गेल्या सहा महिन्यांपासून मधुमेहाच्या आजारामुळे त्यांनी अवैध व्यवसायाला कायमस्वरूपी रामराम ठोकला. त्यांचा अवैध व्यवसाय सुरु असावा, या उद्देशाने सेलू पोलीस ठाण्यातील विजय कापसे नामक कर्मचारी रविवार ता.१८ रोजी सांयकाळच्या सुमारास त्यांच्या घरी पोहचला. यावेळी ते स्वतः देखील मद्यधुंद अवस्थेत होते हे विशेष.. त्यांनी जाधव यांना “पाच हजार रुपये दे, अन्यथा तुला अंदर टाकतो”, असे म्हणून त्यांना आपला पोलिसी खाक्या दाखवला. परंतु त्यांचा व्यवसायचं ठप्प असल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. हाच राग मनात धरून “कापसे” यांनी त्यांना फरफटत पोलीस ठाण्यात नेले. तेथील आपल्या क्वार्टरमध्ये आत नेले आणि “सांग पैसे देते का, ठोकू केस..” म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी आपल्या घरी फोन करून कसेबसे तीन हजार रुपये आणून कापसेच्या मढ्यावर घातले. परंतु त्यांची हाव काही संपतच नव्हती. त्यांनी जाधव यांना खाली जमीनीवर पाडले आणि बुटाच्या सहाय्याने त्यांच्या पाठीवर आणि हाताला मारहाण केली.
जाधव आधीच मधुमेहाच्या आजाराने बाधित असल्याने आणि वेळेवर इन्सुलिन न मिळाल्याने त्यांची अवस्था पोलीस ठाण्यातच अत्यवस्थ झाली. शेवटी कुटुंबातील सदस्य आले आणि त्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची नाजूक अवस्था बघता तेथील डॉक्टरांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात रेफर केले. तेथे त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
दरम्यान याविषयी त्यांच्या परिवारातील महिला सदस्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु त्यांची पत्नी आणि मुलीला रात्रभर पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवून शेवटी पहाटे चार वाजता कशीबशी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. यादरम्यान तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील येवून गेल्याचे कळते. अद्याप याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही हे विशेष.. त्यामुळे या हप्तेखोर, निर्दयी आणि क्रुर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पिडीत परिवारातील सदस्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून केली.
*दारुबंदीचे पोलिसांकडुन उल्लंघन*
अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अहोरात्र प्रयत्न करीत आहे, परंतु त्यांचेच काही कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना गालबोट लावत आहे. कारवाईच्या नावाखाली स्वतःच दारु ढोसून आपला रुबाब झाडत आहे. “धंदा करा आणि हप्ता द्या” यासाठी पोलिसचं अवैध व्यवसायाला खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी येथील पोलीस ठाण्यातील कोणता कर्मचारी अवैध व्यावसायिकाकडुन किती घेतो, ह्याची आडियो क्लिप देखील समाजमाध्यमात व्हायरल झाली होती. परंतु त्यापासून कोणत्याही प्रकारचा बोध न घेता सगळं काही ऑल इज वेल असल्याचे भासवले जाते. एकप्रकारे पोलिसांकडुनचं दारुबंदीचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते.