बुलेटस्वार भामट्यांनी वृद्धास घातला गंडा ; सोनसाखळी व अंगठी घेऊन भामटे पसार
सचिन धानकुटे
वर्धा : – शेतातून घरी परतणाऱ्या वृद्धास दोन भामट्यांनी गंडा घालून त्यांची सोनसाखळी व अंगठी घेऊन पोबारा केल्याची घटना देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वर्ध्यातील प्रतापनगरात राहणाऱ्या मोहनलाल धनराज गांधी (वय ७०) ह्यांची देवळी परिसरात शेती आहे. ते आपल्या शेतातून काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीने आपल्या घरी जात होते. दरम्यान त्यांच्या मागाहून अचानक दोन भामटे पिवळ्या रंगाच्या बुलेटने आले. त्यांनी मोहनलाल यांना पोलीस असल्याची बतावणी करून समोर दंगा सुरू असून आम्ही तपासणी करीत असल्याचे सांगितले. तुमच्याकडे असलेले दागिने आमच्याकडे द्या, तुम्हाला ते सुरक्षित कागदाच्या पुडीत बांधून देतो असे म्हटले. यावर मोहनलाल यांनी त्यांच्याकडे असलेली दिड तोळ्याची लाँकेटवाली सोनसाखळी व सहा ग्रँमची अंगठी काढून भामट्यांच्या स्वाधीन केली आणि कागदी पुडी घेऊन निघाले. दरम्यान ते देवळी बसस्थानकासमोर थांबले असता त्यांनी ती कागदी पुडी उघडून बघितले असता त्यात दोन लहान दगडं आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
याआधीही पंधरा दिवसांपूर्वी सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमकी अशाचप्रकारे घटना घडली होती. त्यावेळी देखील पोलीस असल्याची बतावणी करीत दोन भामट्यांनी वृद्धाची पाच ग्रँमची अंगठी घेऊन त्यांच्या हाती दगडं असलेली कागदाची पुडी दिली. मात्र याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज व्यक्त होत आहे.