चोरट्याने पळसगांवच्या कोल्हापूरी बंधाऱ्यात टाकली चोरीची मोटारसायकल ; नागपूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरटा गजाआड
सचिन धानकुटे
सेलू : – सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरुन ती पळसगांव येथील नदीच्या कोल्हापूरी बंधाऱ्यात टाकणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुट्टीबोरी येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. राहुल उर्फ अक्षय गुलाब पंधरे (वय२४) रा. भिडगांव (पारडी), ता. कामठी, जिल्हा नागपूर असे त्या मोटारसायकल चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोर उभी ठेवलेली मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार तालुक्यातील सिंदी(रेल्वे) पोलीस ठाण्यात ता. ७ मार्च रोजी दाखल होती. सदर गुन्ह्याचा तपास करीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील चोरट्यास बुट्टीबोरी येथून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरलेली मोटारसायकल पळसगांव येथील नदीच्या कोल्हापूरी बंधाऱ्यात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता बंधाऱ्याच्या खोल पाण्यात एम एच ३२ एपी ७२८३ क्रमांकाची होंडा शाईन मोटारसायकल आढळून आली. यातील आरोपी मोटारसायकल चोरट्यास सध्या सिंदी(रेल्वे) पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर, राजेश तिवसकर, राकेश आष्टणकर, विकास अवचट आदि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.