वर्ध्यात कपाशीचे बोगस बियाणे आढळल्याने खळबळ..! मोहगांवात सोमनाथ ६५९ कंपनीचे ९२ पाकीट जप्त, एकास अटक
सचिन धानकुटे
वर्धा : – गेल्या वर्षी हंगामाच्या अगदी सुरवातीला जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला होता. यावेळी देखील कपाशीच्या सोमनाथ ६५९ पिंकार्ड कंपनीचे ९२ पाकीट समुद्रपूर तालुक्यातील मोहगांव येथील एका घरात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गिरड पोलिसांनी याप्रकरणी मोहगांव येथील कैलास पांडुरंग नवघरे(वय३८) ह्यास आज रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पोलीस विभागाच्या मदतीने मोहगांव येथील कैलास पांडुरंग नवघरे यांच्या घरी काल शनिवारी रात्री साडेअकरा वाजता धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरझडतीत एका हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पाकीटावर सोमनाथ ६५९ पिंकार्ड असं लिहिलेले अधिकृत नाव नसलेले प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ९२ कपाशीच्या बियाण्यांचे पाकीट आढळून आले. ज्यात ४५० ग्रॅमच्या प्रति पाकीटानूसार ४१ किलो ४०० ग्राम वजनाचे कापूस बियाणे ज्याची किंमत ७९ हजार ४८८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कैलास नवघरे यांच्या विरोधात गिरड पोलीस ठाण्यात भांदवि कलम ४२०, १८८ सहकलम बियाणे नियंत्रण आदेश १९८३ कलम ३, ८, बियाण्यांचे नियम १९६८ चे कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, ३८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ७, ८, ९, १०, १५, १६ यासोबतच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नूसार कलम १, २, ३ व ७ अशा प्रकारच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली.
शेती हंगामाच्या तोंडावरचं जिल्ह्यात पुन्हा एकदा बोगस बियाणे आढळून आल्याने एकूणच कृषी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी गिरड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.