अहवालात चुकीची माहिती सादर केल्याने दिव्यांगाचा संसार पाण्याखाली..! चेन्नूरवार नामक तलाठ्याचा प्रताप
सचिन धानकुटे
सेलू : – तलाठ्याने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात चुकीची माहिती सादर केल्याने वडगांव(खुर्द) येथील दिव्यांगाचा अख्खा संसार पाण्याखाली गेला. गेल्या सात वर्षांपासून दिव्यांग गजानन वांढरे आपल्या हक्काच्या जागेसाठी लढा देत आहेत. प्रशासनाच्या डोळ्यावर असलेली झापडं उघडण्यासाठी यासंदर्भात सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आलेत, तेवढ्या का पूरते प्रशासन अलर्ट मोडवर येते, मात्र स्थानिक तलाठी सुनिल चेन्नूरवार यांना काही घाम फुटत नसल्याने अखेर दिव्यांग गजाननचा अख्खाच्या अख्खा संसार पाण्याखाली गेला आहे.
वडगांव(खुर्द) येथील तलाठी सुनिल चेन्नूरवार यांनी सदर जागे संदर्भात शासनाकडे जो अहवाल सादर केला. त्यात जाणिवपूर्वक चुकीचा सर्व्हे नंबर टाकण्यात आला. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून दिव्यांगाचा आपल्या हक्काच्या जागेसाठीचा लढा आजही कायम आहे. यातील तलाठी महाशयांच्या डोक्यावर आधीच परिणाम झाल्याचे बोलल्या जाते, कारण त्यांनी अनेक प्रकरणांत अशा प्रकारे मोठा घोळ निर्माण केला आहे. एरव्ही इतर वारसदारांच्या संमतीशिवाय शासकीय निधी वळता करता येत नाही, परंतु चेन्नूरवार यांनी त्यातही पिएचडी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सदर साझ्याचा कारभार पाहतात, त्यामुळे वरील प्रकरणात चुकीचा सर्व्हे नंबर टाकून त्यांनी जणूकाही दिव्यांगाला वेठीस धरण्याचा चंगच बांधला की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
त्या दिव्यांगाचे काम गेल्या सात वर्षांपासून होत नसल्याने साहजिकच तो प्रशासनाच्या उंबरठ्यावर तसेच लोकप्रतिनिधीकडे आपली कैफियत मांडत असतो. केवळ हाच राग उराशी बाळगून तलाठी चेन्नूरवार त्यांच्या सरळ कामात वारंवार अडचणी निर्माण करीत आहे. त्यामुळे शासनाच्या अहवालात चुकीची माहिती सादर करणाऱ्या या तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.