बारा ज्योतिर्लिंगांची झाकी साकारत महाशिवरात्री महोत्सव साजरा

सचिन धानकुटे
सेलू : – येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांची झाकी साकारण्यात आली होती.
स्थानिक प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयात महाशिवरात्री महोत्सवा निमित्त आयोजित शोभायात्रेला ब्रह्माकुमारी मधुदिदी यांनी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गांनी फिरविण्यात आली. शोभायात्रेत शिवशंकर, विक्रमादित्य राजा यांचे विद्यालयाच्या लहान चिमुकल्यांनी दर्शन घडविले तसेच गावातील भाविक भक्तांनी दर्शन घेत लाभ घेतला. शोभायात्रेद्वारे परमात्मा शिव यांचा वास्तविक परिचय करून देण्यात आला. या शोभायात्रेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शोभायात्रा स्थानीय शिवशक्ती भवनात पोहोचताच सेलू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नवीन चौधरी व माधुरी दीदींनी ध्वजारोहण केले.
त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगाच्या झाकीचे उद्घाटन, शिवजींची पूजा व दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सेलू सेवा केंद्राच्या संचालिका ब्रम्हाकुमारी दर्शना दीदी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. ब्रह्माकुमारी रीना दीदी यांनी विद्यालयाचा परिचय व पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत केले. वर्धा सेवा केंद्र संचालिका माधुरी दीदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व विषद केले. यावेळी नवीन चौधरी यांनी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात. कुमारी इशिका वानखेडे, कुमारी चैताली मानकर व कुमारी कृपा सोनटक्के यांनी सुंदर नृत्य प्रस्तुतीद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली. ब्रह्मकुमारी मधु दीदी यांनी सभेला राजयोगाची अनुभूती करविली. ब्रह्माकुमारी अपर्णा दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व ब्रह्माकुमारी दर्शना दीदी यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी वैष्णवी दीदी व विद्यालयाच्या भाऊ बहिणींनी सहकार्य केले.