धक्कादायक…! भाऊच ठरला भावासाठी कर्दनकाळ ; कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या ; देवनगर येथील घटनेने खळबळ
सचिन धानकुटे
सेलू : – कुऱ्हाडीने वार करीत चक्क लहान भावानेच मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगणीजवळ असलेल्या देवनगर येथे आज भरदिवसा घडली. रवींद्र बंडूजी तराळे (वय ३२) असे हत्या झालेल्या मोठ्या भावाचे तर अमोल बंडूजी तराळे(वय२८) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणीला लागुनच असलेल्या देवनगर येथील वार्ड क्रमांक तीनमध्ये दोन्ही भावंडं आपल्या आईवडीलांसमवेत राहत होती. दोन्ही भावंडात गेल्या काही दिवसांपासून घरगूती कारणांमुळे कलह सुरू होता. अशातच आज दुपारी मोठा भाऊ रवींद्र हा आपल्या घरी झोपून असताना लहान भाऊ असलेल्या अमोलने कुऱ्हाडीने रवींद्रच्या मानेवर व चेहऱ्यावर वार करीत त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.