पोहण्याचा नाद बेतला जीवावर ; विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने युवकाचा मृत्यू ; तब्बल २६ तासानंतर आढळला मृतदेह
सचिन धानकुटे
सेलू : – पाणी पुरवठ्याच्या जलाजम विहिरीत पोहण्याच्या नादात एका युवकास आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील मौजा बोरखेडी येथे मंगळवारी घडली. प्रल्हाद पंजाबराव नेहारे(वय२२) रा. करंजी भोगे असे मृतक युवकाचे नाव आहे. काल मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या “त्या” युवकाचा मृतदेह तब्बल २६ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज बुधवारला दुपारी दिड वाजता पाण्याबाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी(झडशी) येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीशेजारीच स्विच रुमचे बांधकाम सुरू आहे. सदर कामासाठी मंगळवारी रेहकी येथील काही मजूर व त्यांच्या समवेत कळंब येथील विक्की नेहारे आणि त्यांचा करंजी भोगे येथील पुतण्या प्रल्हाद नेहारे हा देखील मजूरीसाठी गेला होता. परंतु कामाच्या ठिकाणी सिमेंट उपलब्ध नसल्याने सगळेच आपापल्या पद्धतीने वेळ घालवत होते. अशातच विक्की नेहारे आणि त्यांचा पुतण्या प्रल्हाद यांनी तेथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीत पोहण्याचा बेत आखला. सदर विहिरीत जवळपास ४३ फुट पाण्याची पातळी आहे. या विहिरीत दोघेही काकापुतणे पोहले देखील, परंतु काही वेळाने काका विक्की नेहारे यांची दमछाक झाल्यानंतर ते विहिरीतीलच एका कडीला पकडून थांबले होते. परंतु पुतण्या प्रल्हाद हा मात्र पाण्याच्या बाहेर न येता तो त्यात बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात लागलीच संबंधितांना आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. परंतु विहिरीत पाणीच इतके होते सगळे प्रयत्न असफल ठरलेत.
शेवटी आज बुधवारला पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करण्यात आला. शेवटी दुपारी दिड वाजताच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने मृतक प्रल्हादचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.