आंजी (मोठी) येथे एक लाखांचा १७५ किलो सुंगधित तंबाखू जप्त ; विक्री व वाहतूक करणाऱ्या तिघांवर कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या कंपनीचा १७५ किलो सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला. याप्रकरणी तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून एकास अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंजी(मोठी) येथे केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी गस्तीवर असताना त्यांना आंजी(मोठी) येथे एका इसमाच्या घरी प्रतिबंधीत सुंगधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत आंजी(मोठी) येथे त्या घरी छापा टाकला. यावेळी महेंद्र पांडुरंग रेवतकर(वय४२) यांच्या घरी पोलिसांना वेगवेगळ्या कंपनीचा जवळपास १७५ किलो सुंगधित तंबाखू व पान मसाला आढळून आला. सदर माल बुट्टीबोरी येथील नवप्रभात ट्रेडर्सच्या विराग वैरागडे व वर्धा येथील शुभम होलानी या दोघांकडून रेवतकर यांनी खरेदी केल्याचे सांगितल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महेंद्र रेवतकर यास ताब्यात घेऊन तिंघावरही खरांगणा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १ लाख ६ हजार ३६० रुपयांचा १७५ किलो तंबाखू जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, मनिष कांबळे, पवन पन्नासे, नितीन इटकरे, प्रदिप वाघ आदि कर्मचाऱ्यांनी केली.