मोटारसायकल चोरून धूम मचविणारा चोरटा “यश” गजाआड ; रामनगर पोलिसांची कारवाई
सचिन धानकुटे
वर्धा : – रामनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्यात. यश गोपी बैसवार(वय२१) रा. भाजी मार्केट जवळ, वर्धा असे अटक करण्यात आलेल्या मोटारसायकल चोरट्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिपरी(मेघे) परिसरातील एका वर्कशॉपच्या समोर उभी असलेली डब्ल्यू एम आर १४४७ क्रमांकाची बुलेट चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी वाहनचोरीचा गुन्हा दाखल करून घेत तपासाला गती दिली. दरम्यान रामनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने याप्रकरणी शहरातील भाजी मार्केट परिसरातील यश गोपी बैसवार यास ताब्यात घेऊन त्याचा खरपूस समाचार घेतला. तेव्हा त्याने चोरीला गेलेल्या बुलेटसह एक नंबर नसलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल जी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरली होती ती जप्त केली. यासोबतच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची एमएच ३२ एआर ४३६३ क्रमांकाची मोपेड असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख दिनेश कांबळे, धर्मेंद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते आदि कर्मचाऱ्यांनी केली.