बियरच्या बाटलांचा चक्क रस्त्यावर सडा अन् नागरिकांची धावाधाव ; समृद्धी महामार्गावर निलगायीला वाचविण्याच्या नादात पलटला ट्रक
सचिन धानकुटे
सेलू : – समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास महाकाळ शिवारात घडली. यावेळी ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटलसाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच ४० पीएम २६१५ क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपुरच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी करकचून ब्रेक मारला. मात्र यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. ही घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास महाकाळ शिवारातील चॅनेल नंबर ५२ प्लस २०० नजिक घडली. सदर घटनेत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक कलंडल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल मनोहर मुडे करीत आहे.