मी वाढदिवस साजरा करायला पात्र आहे किंवा नाही, याची चाचणी माझ्या मृत्यूनंतरच होईल : बापूंनी २ ऑक्टोबर १९१८ रोजी व्यक्त केली होती भावना
किशोर कारंजेकर
वर्धा : आपल्या दोन किडकिडीट हातावर राष्ट्र पेलण्याची क्षमता असलेले गांधीजी आज हयात असते तर त्याचे वय १५४ वर्षांचे असते. शुचिर्भूत जीवनाची साक्ष देणार्या बापूंची २ आॉक्टोबर रोजी जयंती. पण त्यांच्या वाढदिवसाच्या सेवाग्राम तसेच २०१८ मधील २ ऑक्टोबर रोजी घडलेले प्रसंग या महात्म्याची समर्पण वृत्तीची उच्च भावना स्पष्ट करते. प्रसिद्ध गांधी विचारवंत रामचंद्र राही यांनी त्यातील एका आठवणीला उजाळा दिला आहे. २ ऑक्टोबर १९१८ रोजी त्यांच्या वाढदिवस साजरा करायला आलेल्यांजवळ `मी वाढदिवस साजरा करायाला पात्र आहे किंवा नाही, याची चाचणी माझ्या मृत्यूनंतरच होईल`, असे बापूंनी स्पष्टच सांगितले होते.
`मेरा जीवनही मेरा संदेश है`, म्हणणारे बापू त्यांच्या वाढदिवस कसा साजरा करायचे, त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला काय, अशा अनेक कुतूहल जागे करणार्या बाबी आहेत. प्रसिद्ध गांधी विचारवंत रामचंद्र राही म्हणतात, गांधीजींनी कधीही त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. २ ऑक्टोबर १९१८ रोजीच्या एका घटनेचा रामचंद्र राही यांनी हवाला दिला. त्या दिवशी काहींनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले. पण बापू म्हणाले, `मी वाढदिवस साजरा करायाला पात्र आहे किंवा नाही,याची चाचणी माझ्या मृत्यूनंतरच होईल`.
`चले जाव` चळवळ सुरू झाल्यानंतर इंग्रजांनी १० ऑगस्ट १९४२ रोजी बापूंना आगाखान पॅलेसमध्ये नजरवैâदेत ठेवले होते.२१ महिने बापू आगाखान पॅलेसमध्ये नजरवैâदेत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असणार्यांनी त्यांचा वाढदिवस दोन वेळा साजरा झाला.त्याबाबत फारशा नोंदी नाहीत. सेवाग्रामच्या प्रसंगाची चर्चा नेहमीच बापूंसोबत राहिलेल्य़ा मुन्नाभाई शहा यांच्या पत्नी कांचनबेन शहा नेहमी सांगत.
एका वाढदिवसाला बापूंना २ ऑक्टोबर रोजी सकाळी बकरीच्या आवाजाने जाग आली. त्यांनी सहकार्यांना विचारले, `हा काय प्रकार आहे`? त्यावर त्यांच्या सहकार्यांनी `तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने ही बकरी आम्ही भेट दिली आहे`, असे सांगितले. बापूंच्या चेहर्यावर निर्व्याज हसू उमटले. त्यादिवशी सरोजिनी नायडू यांनी कोबीचे सूप तयार करून बापूंना दिले होते. ही आठवण आगाखान पॅलेसमधील गाईड नीलम महाजन यांनीच सांगितली होती. ६ मे १९४४ रोजी बापूंची इंग्रजांनी नजरवैâदेतून सुटका केली होती.याच आगाखान पॅलेसमध्ये बापूंनी इंग्रजांच्या दडपशाही विरोधात २१ दिवसांचा उपवास केला होता.
बापूंचा दिनक्रम २ ऑक्टोबर रोजीही नेहमी सारखाच राहायचा. नेहमीचा दिनक्रम ते पाळायचे. ते ठरलेल्या वेळी प्रार्थना करायचे.चरखा फिरवीत भेटायला आलेल्यांना भेटायचे. उर्वरित वेळी मौन पाळायचे. पण नागरिक त्यांचा वाढदिवस साजरा करायचे.
`बा` हयात असेपर्यंत बापूंना कुंकुम तिलक लावत औक्षण करायच्या. पण याबाबतही बापू किती दक्ष राहात, याची जाणीव करून देणारा प्रसंग सेवाग्रामच्या आश्रमात घडला होता.१९३६ मध्ये बापू सेवाग्रामला राहायला आले होते. त्याचदरम्यान त्यांचा वाढदिवस आला. बापूंना दररोजच भेटाय़ला नागरिक सेवाग्राम आश्रमात यायचे. बापूंचा वाढदिवस असल्याने `बा` यांनी त्यांचे औक्षण करायचे ठरविले. त्याकरीता तबक सजविले गेले.त्यात साजूक तुपाचे निरांजन होते. बापूंचे औक्षण करतानाच बापूंची नजर त्या निरांजनावर तसेच त्यातील तुपावर गेली.बापू `बां`ना म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त या निरांजनात फूलवातीकरीता तूप जाळण्याची गरज काय आहे, येवढेच तूप एखाद्या लहान किडकिडीत अशक्त मुलाला दिले तर त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला काहीसा हातभार लागेल. बापूंनी ते निरांजन नाकारले. निरांजनातील तूप काढले गेले. निरांजनातील तूप सेवाग्राममधून आईच्या कडेवर बसून आलेल्या बालकाला खायला दिले गेले आणि त्यानंतरच बापूंनी `बा`ना औक्षणाची परवानगी दिली.
आता वाढदिवसाचे आयाम बदलले. बापूंचे नाव घेत त्यांचा जयजयकारही केला जातो.पण त्यांच्या शिकवणीला स्वीकारण्याचे काय, हा प्रश्न कायम अनुत्तरीत ठेवून. याकरीता बापूंकडे क्षमा मागायचीही दानत पाहिजे, हेच खरे आहे.
१५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केला.तो तसा पार पडतोही, पण…
“”””” आपल्या आयुष्यातल्या चुका कुठेतही आपल्याला कुरतडत असतातच. आपले आयुष्य इतक्या खुलेपणाने, पारदर्शकपद्धतीने बापूंनी जगासमोर मांडले. भल्या भल्यांना हे धाडस होत नाही. त्यामुळे ते जगातले एकमेव धैर्यवान महापुरुष ठरतात. त्यातूनच बापूंनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याबाबत व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या धिरोदात्त आत्मविश्वासाला प्रगट करीत असाव्यात.”””””