आंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू ; बोर नदीपात्रातील घटना

सचिन धानकुटे
सेलू : – येथील बोर नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या सात वर्षीय बालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यश महेश ठाकरे रा. कोथीवाडा, गणेशनगर सेलू असे मृतक बालकाचे नाव आहे.
मृतक यश हा आपल्या मित्रांसोबत लगतच्या बोर नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्याचे आईवडील हे कामावर गेल्याने त्याच्या घरी कोणीही नव्हते. दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याचे वडील घरी परतले, तेव्हा त्यांना यश दिसला नाही. त्यांनी त्याचा शोध घेत असतानाच कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एका महिलेने एक मुलगा पाण्यावर तरंगत असल्याचे सांगितले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली असता यशचा मृतदेह पाण्यात आढळला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.