पोलिसांच्या वाहनाची ट्रकला धडक ; महिला पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू ; तीन कर्मचाऱ्यांसह आरोपीही गंभीर जखमी
सचिन धानकुटे
वर्धा : – पोलिसांचे वाहन समोरील ट्रकवर जोरात आदळल्याने झालेल्या अपघातात हरियाणा येथील महिला पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक आरोपी गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पांढरकवडा शिवारात घडली. हरियाणा राज्यातील पंचकुला पोलीस स्टेशनचे पथक परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला घेऊन नागपूरच्या दिशेने जात होते, दरम्यान हा अपघात घडला.
हरियाणा येथील पोलिसांचे पथक परभणी येथील आरोपी वैजनाथ शिंदे ह्याला घेऊन एच आर ०३ जिव्ही १७८२ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो वाहनाने समृद्धी महामार्गावरुन नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांचे वाहन समोरच्या ट्रकवर जोरात धडकले. यात पोलीस वाहनाचा समोरील भाग अक्षरशः क्षतिग्रस्त झाला. सदर अपघातात महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंदर सिंह, मिठ्ठूसिंह जगडा, वाहन चालक शम्मी कुमार, आरोपी वैजनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सदर अपघातातील जखमींना तातडीने सांवगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात आपल्या ताफ्यासह तसेच जाम महामार्ग पोलीस चौकीचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.