समीर देशमुख यांची राष्ट्रवादीत घरवापसी ; शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
किशोर कारंजेकर
वर्धा : – गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवबंधनात अडकलेल्या समीर देशमुख यांनी आज पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे त्यांची अनेकवेळा रखडलेली घरवापसी ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी तारणहार ठरणार का.. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जिल्ह्यातील समीर देशमुख हे पुर्वाश्रमी राष्ट्रवादी काँग्रेसचेचं होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी देवळी मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून हाती शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. देवळी मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढवत त्यांनी तब्बल ३१ हजारावर मते घेतली. परंतु त्यावेळी भाजपच्या राजेश बकाणे यांनी युतीधर्म न पाळत त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढली. यात दोन्ही नेते भुईसपाट झाले आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. तेव्हापासूनच समीर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास आतूर होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच कार्यक्रमांना ते उपस्थितही असायचे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी दरम्यान ते परत एकदा पक्षाचे सक्रीय सभासद देखील झाले. परंतु त्यांचा पक्षप्रवेश मात्र या ना त्या कारणाने सतत रखडला होता. मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरद पवार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अनिल देशमुख, राजेश टोपे, दिलीप वळसे पटील, सुनील तटकरे, फौजिया खान, धनंजय मुंडे, अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, वर्धा जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, राहुल घोडे, पुंडलिक पांडे उपस्थित होते.