शाळकरी विद्यार्थीनींचा पाठलाग करणारा आंबटशौकीन अखेर सापडला..! पालकांनी गचांडी धरत केले पोलिसांच्या हवाली
सचिन धानकुटे
सेलू (ता.११) : – शाळकरी विद्यार्थीनींचा पाठलाग करीत त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवणाऱ्या एका भामट्याविषयी विद्यार्थीनींनी आपल्या पालकांना कल्पना दिली. पालकांनी “त्या” आंबटशौकीन भामट्यावर दिवसभर पाळत ठेवली. दरम्यान शाळा सुटताच विद्यार्थी बाहेर पडले आणि “त्या” भामट्याने आपला उपद्व्याप सुरू केला. अखेर पालकांनी त्याला आज रंगेहात पकडले आणि त्याची गचांडी धरुन पोलिसांच्या हवाली केले. सदर नाट्यमय घटना आज गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शहरातील एका शाळेसमोर घडली.
शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर उभा राहून तेथील विद्यार्थीनींवर पाळत ठेवणे. त्या घराच्या दिशेने निघाल्या की कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करीत त्यांचा पाठलाग करणे आणि त्यानंतर त्यांना वाटेत एकांतात गाठले की, चॉकलेटचे आमिष दाखवणे. आंबटशौकीनाच्या ह्या सततच्या उपक्रमाला कंटाळलेल्या अनेक विद्यार्थीनींनी अखेर याविषयीची व्यथा आपल्या पालकांसमोर कथन केली. त्यांनी आज गुरुवारी दिवसभर “त्या” आंबटशौकीनावर पाळत ठेवली आणि अखेर आज शाळा सुटताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या वाहनांच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात चॉकलेटसह अन्य वस्तू आढळून आल्यात. मुळचा तो चंद्रपूरचा असल्याचे सांगितल्या जाते. यावेळी पालकांच्या हाती तो भामटा लागताच त्यांनी त्याची गंचाडी धरून त्याला फरफटत पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याला तंबी देत त्याच्यावर प्रतिबंधात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांआधीच शहरातील आठवडी बाजारात एका मनोविकृताने महिलेशी असभ्य वर्तन केल्याने त्याला नागरिकांनी चांगलाच प्रसाद दिला. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी घडलेल्या प्रकारामुळे काहिशा भयभीत झालेल्या “त्या” विद्यार्थ्यांना सध्या तरी दिलासा मिळाला असून अशा प्रकारच्या भामट्यांच्या वेळीच नांग्या ठेचणे गरजेचे असल्याचे मत यावेळी पालकांकडून व्यक्त करण्यात आले.