वनपरिक्षेत्र अधिकारी “गायनेर” अडकला एसीबीच्या जाळ्यात ; तीन हजारांची लाच घेताना अटक
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्यातील बड्या अधिकाऱ्यांत लाच घेण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे. मागील आठवड्यात बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता एक लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या गळाला लागला. सदर वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच आता कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तीन हजार रुपयांची लाच घेताना आज त्यांना त्यांच्या कारंजा येथील कार्यालयातच अटक करण्यात आली. राजेंद्र बालाजी गायनेर(वय५६) असे त्या लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे.
कारंजा घाडगे येथील वनविभागाच्या जमिनीचे नुकसान केल्याच्या कारणांतून संबधितावर वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर कार्यवाहीचा निपटारा करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यासाठी आज कारंजा येथील वनविभागाच्या कार्यालयातच तीन हजार रुपयांची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकारी गायनेर यांना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. दरम्यान त्यांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता जवळपास ९१ हजारांची रोख रक्कम देखील आढळून आली. याप्रकरणी गायनेर यांना अटक करीत त्यांच्यावर कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक डी सी खंडेराव, पोलीस निरीक्षक संदीप थडवे, रवींद्र बावणेर, संतोष बावणकुळे, कैलास वालदे, निलेश महाजन, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे आदि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.