भाजपच्या सरपंच पुत्राची अशीही गुंडागर्दी..! पाहूणपणासाठी सासरी आलेल्या जावयांना मारहाण, एक गंभीर जखमी
आरएनएन न्युज नेटवर्क
सेलू : – पोळ्याच्या सणाला पाहुणंपणासाठी सासरी आलेल्या दोन जावयांना विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील हिंगणी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सदर प्रकार स्थानिक महिला सरपंच महोदयांच्या नशेडी दिवट्यानेच केल्याने गावकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर थातूरमातूर कारवाई केली खरी..! परंतु यानिमित्ताने भाजपच्या सरपंच पुत्राची गुंडागर्दी मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणाच्या निमित्ताने हिंगणी येथील इसराईल शेख चुडीवाले यांचे दोन्ही जावई आणि मुली पाहुणंपणासाठी गावी आले होते. दोन्ही जावयांनी सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर बसस्थानकावर पान खाल्ले आणि शतपावलीसाठी म्हणून स्थानिक बिरसा मुंडा चौकाकडे जात होते. दरम्यान येथील महिला सरपंचाचा मुलगा वैभव प्रमोद डेकाटे, त्याचा मित्र मोहित डेकाटे व शंतनु चौधरी या तीनही गावगुंडांनी मोटारसायकलने मठ्ठा मारलेल्या अवस्थेत त्यांना रस्त्यात अडवले. “तुमचं नाव काय आणि कोठून आले” अशी विचारणा केली. यावेळी पाहुण्यांनी सासूरवाडीला पाहुणंपणासाठी आल्याचे आवर्जून सांगितले देखील, परंतु तीनही आरोपींनी त्यांच्यावर अश्लील शिव्यांचा भडीमार केला. यावेळी घाबरलेल्या पाहुण्यांनी यासंदर्भात आपल्या साळ्याला फोनवरून माहिती दिली. तेव्हा सरपंच महोदयांच्या दिवट्याने पाहुण्यांचा मोबाईल देखील हिसकावून घेतला. एवढेच नाही तर तिघांनीही दोन्ही पाहुण्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ‘पुन्हा जर गावात दिसलात, तर मारल्या शिवाय राहणार नाही’ असा धमकीवजा इशारा देखील दिला. दरम्यान त्यांचा साळा सोहेलसह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वादावर पडदा टाकला.
या मारहाणीत दानिश अहमद अब्दुल रशीद(वय२७) रा. नागपूर यांच्या कानाला आणि नाकाला गंभीर इजा झाली तर त्यांचे साडभाऊ शाहबाझ खान शाबू खान रा. नागपूर यांच्या डोक्याला इजा झाली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर तीनही गावगुंडांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सेलू पोलीस करीत आहेत.
“त्या” गावगुंडांवर अनेक केसेस
एसटी महामंडळाच्या बसच्या काचा फोडल्या प्रकरणी वैभव डेकाटे या गावगुंडांवर आधीही केसेस दाखल असल्याचे सांगितले जाते. सेलूच्या बसस्थानकावर रंगदारी करणाऱ्यांत तो आघाडीवर असल्याची चर्चा आहे. यातील काहिंना याठिकाणी प्रसाद देखील मिळाला होता. काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने गावात देखील त्यांची लाल केल्याचं विश्वसनीय वृत्त आहे. अशा प्रकारच्या गावगुंडांच्या वेळीच नांग्या ठेचणे गरजेचे असल्याचे मत यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.