Breaking
ब्रेकिंग

राजकीय अट्टाहासापायी आमदारांचा उद्घाटनाचा घाट, हिंगणीच्या आरोग्य सेवेचा बट्टयाबोळ – राणा रणनवरे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

2 6 8 6 2 1

सेलू : – स्थानिक आमदारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनचा घाट घातल्याने आरोग्य सेवेचा पार बट्टयाबोळ झाला आहे. एकाच कार्यक्रमाच्या चक्क चार चार निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील सदर कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या श्रेयवादाच्या लगीनघाईत आमरण उपोषण कर्त्यांनाही डावलून त्यांचा देखील अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संघटन सचिव राणा रणनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

हिंगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनसाठी एकाचवेळी चार चार पत्रिका छापण्यात आल्यात. सदर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आठ उसणवारी कर्मचारी दिले खरे, परंतु त्या आठ कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी अद्याप तरी त्याठिकाणी उपस्थित झाला नाही. याठिकाणी तब्बल २१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाप मंजूर आहे. याकरिता शासनस्तरावर अद्याप तरी कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. असे असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवेचा खेळखंडोबा करण्यात आलायं. याठिकाणी आरोग्याशी संबंधित उपकरणं आणि औषधी देखील उपलब्ध नाही. येथील ॲलोपॅथी दवाखान्यासाठी जो औषधसाठा पुरविला जायचा, केवळ त्याच्याच भरोशावर सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचा रामभरोसे कारभार सुरू आहे. दरम्यान राजकीय अट्टाहासापायी ॲलोपॅथी दवाखाना देखील सद्यस्थितीत बंद पाडण्यात आला. त्यामुळे हिंगणी आणि लगतच्या २३ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असून याकरिता केवळ आणि केवळ आमदार डॉ पंकज भोयर जबाबदार असल्याचा आरोप यावेळी राणा रणनवरे यांनी केला.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करावे, याकरिता स्थानिक ज्येष्ठ नागरिक शंकरराव दुर्गे आणि भास्करराव मुडे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार निवेदने दिली. उद्घाटनप्रसंगी त्यांनाही डावलून एकप्रकारे त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. शासनाची कुठल्याही प्रकारची मान्यता किंवा पदभरती नसताना आमदार महोदयांनी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी उद्घाटनाचा घाट घातला. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासात साधं पाणी आणि वीज पुरवठा देखील नाही, त्यामुळे याठिकाणी उसणे कर्मचारी देखील थांबायला तयार नाहीत. उद्घाटनापूर्वी डॉ प्रशांत वाडीभस्मे यांची केवळ तात्पुरत्या स्वरूपात सेवा संलग्न करण्यात आली होती. दोन दिवस आधी तर याठिकाणी दोन डॉक्टर आले आणि चक्क बोरधरण फिरायला गेले. त्यानंतर ते असे काही बेपत्ता झाले की पुन्हा दिसलेचं नाहीत. एका रुग्णाची किरकोळ सर्जरी करायची होती, त्यावेळी याठिकाणी फक्त औषध वितरण करणारा कर्मचारी उपस्थित होता, त्यामुळे त्याने देखील डोक्यावर हात ठेवण्यातचं धन्यता मानली. अशा प्रकारे येथील आरोग्य सेवा पार कोलमडली असून केवळ निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी उद्घाटनाचा बागुलबुवा उभा केल्याने नागरिकांतून देखील संताप व्यक्त होत आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संघटन सचिव राणा रणनवरे, कार्याध्यक्ष आशिष ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयुर डफरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शिवानी रणनवरे, सुरगांव येथील सरपंच गोलू उर्फ मुख्तार शेख, नानबर्डी येथील सरपंच रोशन दुधकोहळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 6 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे