ना भूतो ना भविष्यती : भगवा गाव अख्ख भगवे; 280 पैकी 230 नागरिक भाजपात : राजेश बकाने यांनी केला चमत्कार
किशोर कारंजेकर
वर्धा (देवळी) : भारतीय जनता पार्टीचे देवळी-पुलगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख राजेश बकाने यांच्या वाढदिवसानिमित्त देवळी मतदार संघातील अगदी टोकावर असणार्या हिंगणघाट तालुक्यातील भगवा (चानकी) या 80 घराच्या गावातील 280 पैकी 230 स्त्री पुरुषांनी भाजपात प्रवेश घेतल्याने भगवा गाव भगवे झाले असेच म्हणावे लागेल.
स्वातंत्र्याच्या प्राप्ती नंतर विकासापासून कोसोदूर असणार्या या गावात प्रथमच राजेश बकाने यांनी आयुष्मान भारत योजनेचे 5 लाख रुपयाचे विमा कार्ड स्वखर्चाने काढून दिले. त्यांच्या अनेक समस्यांची विचारपूस केली भटक्या विमुक्त जातीतील नाथजोगी समाजाचे हे गाव आहे आजही रेशन, मतदान आणि आधार कार्ड अश्या मूलभूत कागदपत्रापासून हे गाव वंचित आहे. आस्थेने विचारपूस करणारा कोणी तरी आपल्या पाठीशी आहे ही भावना त्या गावाने व्यक्त करून बकाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भगवा गावाने भाजपात प्रवेश केला.
संपूर्ण गावानेच एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश घेण्याची ही महाराष्ट्रातील पहिली घटना असावी. या वाढदिवसानिमित्त राजेश बकाने यांनी हे गाव दत्तक घेऊन शासनाच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे वचन भगवा येथील गावकर्यांना दिले.
यावेेळी राजेश बकाणे यांच्यासह भटक्या विमुक्त भाजपा आघाडीचे अध्यक्ष प्रल्हाद दांडगे, भटक्या विमुक्त आघाडी हिंगणघाट ग्रामीणचे अध्यक्ष शिवाजी पवार, वर्धा जिल्हा भाजपा सरचिटणीस राहुल चोपडा, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली येरावार, संजय गांधी निराधार योजना देवळीचे अध्यक्ष किशोर गव्हाळकर, माधव वानखेडे व मोठ्या संख्येने उपस्थित होते.