कापसाचे गाठोडं घेऊन निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू
सचिन धानकुटे
सेलू : – शेतातील कापसाचे गाठोडे घेऊन घराच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील वडगांव(जंगली) येथे आज रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. रामेश्वर शेषराव पिंपळे (वय४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगांव(जंगली) येथील शेतकरी रामेश्वर पिंपळे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. ते आज सायंकाळी आपल्या शेतातील वेचणी केलेल्या कापसाचे गाठोडे घेण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान शेतातून आपल्या एम एच ४० ई ९४६० क्रमांकाच्या मोटारसायकलने कापसाचे गाठोडे घेऊन घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांची मोटारसायकल अनियंत्रित झाली आणि रस्त्या लगतच्या खड्डयात आदळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी शेतकरी रामेश्वर पिंपळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतक शेतकरी रामेश्वर यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे गावात मात्र ऐन नववर्षाच्या पूर्वसंध्येला शोककळा पसरली.