दादांची काँग्रेसमध्ये “गुपचूप” एन्ट्री..! प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या
सचिन धानकुटे
वर्धा : – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे अर्थात दादांनी अचानक र्काँग्रेसच्या खेम्यात एन्ट्री घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पक्षप्रवेश केला.
सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे गेल्या दोन वर्षांपासून भावी आमदार म्हणून प्रयत्नशील आहेत. मेघे कुटुंबिय भाजपात असतानाच त्यांनी स्थानिक आमदार डॉ पंकज भोयर यांना पक्षांतर्गत आव्हान देण्यासाठी कंबर कसली होती. वर्धा विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबीरासह एकामागून एक असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे दादांना भाजपची उमेदवारी मिळणार की काय..? असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान विधानसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आज दादांनी अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या समवेत येत्या काळात हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते देखील काँग्रेसच्या खेम्यात दाखल होणार असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका पदाधिकाऱ्याने दिली. त्यामुळे जिल्ह्यात भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसमध्ये आधीच एक दादा होते, त्यात आणखी एका दादांची एन्ट्री झाल्याने काँग्रेसला सुगीचे दिवस आल्याचं बोलल्या जाते