सोन्याच्या अंगठी ऐवजी चक्क दगड ; ५१ वर्षीय इसमाची फसवणूक ; सावंगी (मेघे) पोलिसांत गुन्हा दाखल

सचिन धानकुटे
वर्धा : – सोन्याच्या अंगठी ऐवजी चक्क दगड ठेवलेली कागदाची पुडी हाती पडताच फसवणूक झालेल्या इसमाने सावंगी(मेघे) पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात तोतयेगीरीचा गुन्हा दाखल केला आहे.
वरुड येथील रहिवासी गजानन वामनराव मानकर (वय५१) हे आपल्या मोटारसायकलने बुधवारी वायगांव येथून वर्ध्याच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या मागाहून दोन अज्ञात इसम मोटारसायकलने आले आणि त्यांनी गजानन यांना त्यांची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली. दरम्यान “त्या” दोन्ही भामट्यांनी गजानन ह्यांना आम्ही पोलीस असल्याची थाप मारली. रस्त्यावर समोर लुटमार होण्याची शक्यता असल्याने तुमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने काढून टाका असे सांगितले. यावेळी “त्या” दोन्ही भामट्यांनी गजानन ह्यांची सोन्याची अंगठी काढून घेत दगड ठेवलेली कागदाची पुडी त्यांच्या स्वाधीन केली. गजानन मानकर हे जेव्हा एचडीएफसी बँकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी ती कागदाची पुडी उघडून बघीतली असता त्यात चक्क दगड आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सावंगी(मेघे) पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात आरोपी विरोधात तोतयेगीरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.