नोकरीचे आमिष ! विवाहितेला पावणेचार लाखांचा गंडा ; सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल
किशोर कारंजेकर
वर्धा : नोकरीचे आमिष देत विवाहितेला तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांनी गंडविल्याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना सेवाग्राम येथील धन्वंतरीनगरात उघडकीस आली.
कोमल नामक विवाहितेच्या मोबाइलवर अज्ञात महिलेने मेसेज करून आपण एका कंपनीच्या एचआर विभागातून बोलत असल्याचे सांगितले. नोकरीचे आमिष देत तिच्याकडून विविध टास्क सांगून तीन लाख ९५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले.
सायबर भामट्याने तिला ऑनलाइन जॉबबाबतची माहिती दिली. टेलिग्रॅम नामक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून विविध अकाऊंटवर पैसे भरण्यास सांगून विवाहितेची तब्बल ३ लाख ९५ हजार रुपयांनी फसवणूक केली. अखेर विवाहितेने याची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास सेवाग्राम पोलिसांकडून केला जात आहे.