Breaking
ब्रेकिंग

शेतकरी महिला निधीचा खातेदारांना तूर्तास दिलासा..! मालमत्ता विकून ग्राहकांचे पैसे देण्याची अध्यक्षाने घेतली हमी

1 9 7 0 3 3

सचिन धानकुटे

सेलू : – पोलीस अधीक्षक कार्यालयात शेतकरी महिला निधी लिमिटेडचे खातेदार, अभिकर्ता, व्यवस्थापक आणि अध्यक्ष यांच्या दरम्यान बुधवारी पार पडलेल्या तडजोडीअंती खातेदारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. यावेळी अध्यक्ष शरद कांबळे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर स्वतःची मालमत्ता विकून खातेदारांना पैसे देण्याची लेखी हमी घेतली. त्यामुळे डबघाईस आलेली शेतकरी महिला निधी लिमिटेड यातून कसा काय मार्ग काढते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

      शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या बेताल आणि सैराट कारभारामुळे बँक डबघाईस आली आणि सगळे आर्थिक व्यवहार अडचणीत आले होते. भूसंपादन घोटाळ्यातील मोठा “मलिंदा” बँकेच्या बेनामी खात्यात आढळल्याने बँक चौकशीच्या फेऱ्यात चांगलीच अडकली. महिन्याभरापासून बँकेच्या खातेदारांना एक फुटकी कवडी देखील मिळत नव्हती. यासंदर्भातील वृत्त सातत्याने लावून धरल्याने अखेर बँक प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान बँकेच्या खातेदारांनी अभिकर्ता आणि व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले. अध्यक्ष शरद कांबळे देखील दरम्यानच्या काळात तोंड लपवून बिळात दडून बसले होते. शेवटी बुधवार ता.१० रोजी सेलू येथील शाखेचे व्यवस्थापक मनोज चौकोने यांनी अभिकर्ता व खातेदारांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी बँकेच्या अध्यक्ष महोदयांशी संपर्क साधला आणि त्यांची चांगलीच कानउघाडणी करीत तत्काळ हाजीर होण्याचे आदेश दिलेत. दरम्यान “तुम्ही सरळ येता की घ्यायला येवू” असे म्हणताच अध्यक्ष शरद कांबळे देखील लगबगीने पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले.

   यावेळी त्यांनी खातेदारांचा मला एकूण एक पैसा द्यायचा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस अधीक्षक कार्यालयातच एका पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तसे लेखी स्वरूपात लिहून देखील दिले आहे. याकरिता त्यांनी ज्या वंडरलँड वॉटरपार्कमुळे बँक डबघाईला आली त्या वंडरलँड वॉटरपार्कसह आपल्या मालकीची ८४ एकर शेती आणि घर अशी स्वतःच्या पत्नीच्या व भावाच्या नावे असलेली मालमत्ता विकून सगळ्या खातेदारांना कमीतकमी ३० दिवस आणि जास्तीतजास्त ४५ दिवसात पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. या प्रकारामुळे खातेदारांना तूर्तास तरी काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

      बँकेच्या सगळ्या ग्राहक व खातेदारांना विश्वासात घेण्यासाठी अध्यक्षांनी मंगळवार ता.१६ रोजी दुपारी तीन वाजता वर्धा शहरातील विठ्ठल रुख्मिनी सभागृहात एक सभा देखील आयोजित केली असून या सभेला सगळ्या खातेदारांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे खातेदारांचे लक्ष केंद्रित झाले असून अध्यक्ष या सभेत काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

3.7/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे