Breaking
ब्रेकिंग

एकचक्रनगरात उत्खननानंतर आढळली चौमुखी भगवान महाविरांची नयनरम्य मुर्ती..! पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

केळझरात याआधीही आढळले होते जैन मंदिराचे व मुर्त्यांचे अवशेष, पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

1 9 8 4 4 2

सचिन धानकुटे

सेलू : – महाभारतकालीन काळात एकचक्रनगर अशी ओळख असलेल्या तालुक्यातील केळझरच्या बुद्धविहार परिसरात काल मंगळवार ता.२ जानेवारीला प्राचीनकालीन भगवान महाविर यांची मुर्ती आढळली होती. शेतीच्या मशागती दरम्यान स्थानिक शेतकऱ्याला मुर्तीचे अवशेष दिसताच गावात सदर बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आज बुधवारला त्याठिकाणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत घटनास्थळी संपूर्ण खोदकाम करण्यात आले. यावेळी उत्खननानंतर चौमुखी भगवान महाविर यांची प्राचीनकालीन नयनरम्य अशी मुर्ती दिसून आली. 

  गावालगत विहाराच्या मालकीची असलेली शेती आनंदा खोब्रागडे हे बटईने करतात. त्यांनी खरीपामध्ये तुरीचे पीक घेतल्यानंतर गुरांच्या चाऱ्यासाठी म्हणून शेतीची ट्रॅक्टरने मशागत केली. यात जमिनितील माती खालवर झाल्यामुळे अचानक काल मूर्ती वर आली. यावेळी अशोक कुत्तरमारे यांनी उत्सुकतेपोटी दगडाची स्वच्छता केल्यानंतर त्यांना ती एक मुर्ती दिसली. काळ्या पाषाणातील अंदाजे तीन फूट उंचीची अत्यंत सुबक, कोरीव व देखणी मुर्ती दिसताच सदर बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तोबा गर्दी केली.

    यापूर्वीही याठिकाणी विहिरीचे खोदकाम सुरु असताना तीर्थकार भगवान चंद्रास्वामीची मूर्ती उत्खनात आढळली होती. ह्याच विहारात सन १९६० मध्ये सुमारे तेरा फुटांची महाविरांची मूर्ती निघाली होती. नागपूर विद्यापिठाच्या इतिहास संशोधन विभागाच्या माध्यमातुन केलेल्या उत्खननात जैन मंदिराचे अवशेष व मंदिराचा पायवा देखील मिळाला होता. केळझर परिसरात जैन तिर्थकरांच्या मूर्ती नेहमीच आढळतात. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यातील काही मूर्ती बघायला देखील मिळतात. विहार परिसरात मंदिराची कोरीव दगडे मोठ्या प्रमाणात आढळतात. केळझर प्राचीन महाभारतकालीन एक चक्रनगर असल्याचे अनेक इतिहासकारांनी मत व्यक्त केले आहे. येथे भगवान विष्णू, भगवान महाविर, भगवान गौतम बुद्धांच्या मुर्ती उत्खननात मिळाल्या आहेत. या प्राचीन नगरीत पुरातन अशी चार पायऱ्यांची विहीर आहे. अलीकडील उत्खननात गणेशमंदिर परिसरात देखील खोदकामात मूर्ती मिळाली असुन गणपती मंदिरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

   आज त्या घटनास्थळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी केलेल्या संपूर्ण उत्खननानंतर चौमुखी भगवान महाविर यांची नयनरम्य अशी मुर्ती आढळली. तीला यंत्राच्या साहाय्याने व्यवस्थित बाहेर काढण्यात आले. उद्या परत पुरातत्व खात्याचे अधिकारी घटनास्थळी भेट देणार असून संशोधनासाठी ती मुर्ती नागपूरला नेणार असल्याचे कळते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 8 4 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे