आरोग्य व शिक्षण

ग्रामीण विदर्भात प्रथमच कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी

सावंगी मेघे रुग्णालयाचा विशेष उपक्रम : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया      

किशोर कारंजेकर 

वर्धा – जन्मजात कर्णबधिर असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि जीवनात परिवर्तन घडविणारी कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील कान, नाक व घसारोग विभागात करण्यात आली. विदर्भातील ग्रामीण भागात प्रथमच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ही विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई येथील ज्येष्ठ कॉक्लियर इम्प्लांट शल्यचिकित्सक, पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांनी ही शस्त्रक्रिया केली असून या शस्त्रक्रियेच्या निमित्ताने सावंगी रुग्णालयात ‘कॉक्लियर इम्प्लांट प्रोग्राम’ सुरु करण्यात आला आहे. 
या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयाच्या हिप्पोक्रेटस सभागृहात आयोजित अभ्यास सत्रात सुमारे तीन हजार शस्त्रक्रियांचा अनुभव असलेल्या डॉ. मिलिंद कीर्तने यांनी कॉक्लियर इम्प्लांटचे तंत्र आणि उपयोगिता याबाबत मांडणी केली. शासकीय यंत्रणेद्वारे या शस्त्रक्रियेचा विनामूल्य लाभ रुग्णाला मिळत असला तरी शस्त्रक्रियेनंतर येणारा औषधोपचाराचा खर्च, रुग्णाची देखभाल, स्पीच थेरपीतील सातत्य या सर्व बाबी रुग्णाची वाणी विकसित करण्यासाठी महत्त्वाच्या असल्याने रुग्णपरिवार तसेच सरकारी व खाजगी संस्थांनी विशेष लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे डॉ. कीर्तने म्हणाले. या सत्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हा उपक्रम सातत्यपूर्वक राबविण्यात येणार असून रुग्णांच्या उपचारात कोणतीही उणीव राहणार नाही, अशी ग्वाही डॉ. ओम्बासे यांनी दिली. यावेळी सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कान, नाक व घसारोग विभाग प्रमुख डॉ. प्रसाद देशमुख यांनी केले. संचालन डॉ. सागर गौरकर व डॉ. वैदेही हांडे यांनी केले, तर आभार डॉ. श्रद्धा जैन यांनी मानले.
या सत्रानंतर सावंगी रुग्णालयातील अद्यावत शस्त्रक्रियागृहात डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली दोन बालकांच्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शल्यचिकित्सकांच्या चमूत बधिरीकरणतज्ञ डॉ. सेन, डॉ. निखिल भालेराव, डॉ. प्रसाद देशमुख, डॉ. श्रद्धा जैन, डॉ. चंद्रवीर सिंग, डॉ. सागर गौरकर, डॉ. आशीष दिसवाल, डॉ. आदित्यरंजन, डॉ. अर्जुन पानीकर, प्रियता नाईक, किरण कांबळे, डॉ. सना परवीन, डॉ. अजिंक्य सांडमारे, डॉ. फराह खान, डॉ. सेनू, डॉ. वैदेही हांडे, डॉ. मनीषा दरा, डॉ. मिथुला मुरली, सुजाता वाघमारे, राहुल खंते, विनोद ठवरे, कामिनी मून, अश्विनी कांबळे, नंदिनी कांबळे, निशा गणवीर, अनुप पुनवटकर, आशीष भेंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. 
सावंगी रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट प्रोग्राम सुरू करण्याबाबत अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विश्वस्त सागर मेघे, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्रकुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे यांच्यासह शासकीय यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे डॉ. प्रसाद देशमुख यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे